नवी दिल्ली : 2024 चा टी-20 विश्वचषक समोर ठेवून आधीच याची तयारी सुरू झाली आहे. पुढील विश्वचषकादरम्यान भारतीय क्रिकेट संघ बदललेला दिसेल अशी चर्चा आहे, नवीन खेळाडूंना संधी आणि जुन्या खेळाडूंना अराम देण्याविषयी बोलले जात आहे, यामध्ये रोहित-विराट सारख्या बड्या खेळाडूंची देखील नावे आहेत. सध्या टीम इंडियाच्या फ्लॉप शो मुळे या चर्चेला उधाण आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्याला दीर्घकालीन कर्णधार म्हणून प्रोजेक्ट केले जाऊ शकते आणि विराट कोहली आणि रोहित शर्माला टी-20 संघातून वगळले जाऊ शकते.

दरम्यान एका प्रसिद्ध वृत्तानुसार रोहित, कोहली आणि अश्विन यांना येत्या काही महिन्यांत हळूहळू टी-20 संघातून वगळण्यात येणार आहे. बीसीसीआयच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पुढील टी-20 विश्वचषकासाठी पूर्णपणे नवीन संघ तयार केला जाईल. तर हार्दिक पांड्याकडे संघाची कमान सोपवली जाईल.

सूत्रानुसार, “बीसीसीआय कधीही कोणत्याही खेळाडूला निवृत्ती घेण्यास सांगत नाही. हा सर्वस्व त्या खेळाडूचा वैयक्तिक निर्णय असतो. 2023 मध्ये जास्त टी-20 सामने नसले तरी आणि या कारणास्तव बहुतेक सीनियर एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांवर लक्ष केंद्रित करतील. तुमची इच्छा नसेल तर तुम्हाला सेवानिवृत्ती घेण्याची गरज नाही. बहुतेक सीनियर खेळाडू पुढील वर्षी टी-20 सामन्यात खेळणार नाहीत.”

पुढील वर्षी वनडे विश्वचषक होणार आहे आणि बहुतेक वरिष्ठ खेळाडू फक्त त्यावरच लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती आहे. याचे कारण म्हणजे या ज्येष्ठ खेळाडूंसाठी हा शेवटचा एकदिवसीय विश्वचषक ठरू शकतो. विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गज क्रिकेटपटूंना भारतात वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकायची आहे.