महाअपडेट टीम, 22 फेब्रुवारी 2022 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि बिजू जनता दलाचे (BJD) अमर पटनायक यांच्यासह 11 खासदारांना यंदाचा ‘संसदरत्न पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. सलग सातव्या वर्षीही सुळे या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.प्राइम पॉइंट फाऊंडेशनने मंगळवारी ही माहिती दिली.

संस्थेच्या ज्युरी समितीने तामिळनाडूतील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते एच.व्ही. हांडे आणि कर्नाटकातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम.वीरप्पा मोईली यांची ‘जीवनगौरव’ पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आलं आहे. यासोबतच संसदेच्या कृषी, वित्त, शिक्षण आणि कामगारांशी संबंधित चार समित्यांना त्यांच्या योगदानासाठी पुरस्कृत केलं जाणार आहे.

चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाउंडेशन (prime-point-foundation) आणि ई- मॅगॅझिनतर्फे संसदेतील खासदारांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो.लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना या पुरस्काराने गौरविण्यात येते. माजी दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.

मागील 12 वर्षांपासून संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात येत असून आतापर्यंत 75 खासदारांना तो देण्यात आला आहे. येत्या 26 मार्च रोजी दिल्लीमध्ये पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडेल, अशी माहिती फाउंडेशन के. श्रीनिवासन यांनी दिली.

गेल्या सात वर्षांपासून सुप्रिया सुळे या संसदेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. चालू लोकसभेच्या कामकाजात 1 जून 2019 ते 11 फेब्रुवारी 2021 या कालावधीत 92% उपस्थिती लावत 163 चर्चांमध्ये आपला सहभाग नोंदविला आहे.

आतापर्यंत त्यांनी 402 प्रश्न उपस्थित केले, इतकेच नाही, तर आठ खासगी विधेयकेही त्यांनी संसदेत सादर केल्याची माहिती आहे. सुप्रिया सुळेंच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.

संसद रत्न पुरस्काराचे यंदाचे मानकरी….

‘संसदरत्न पुरस्कार’साठी निवडलेल्या 11 खासदारांमध्ये लोकसभेतील आठ आणि राज्यसभेतील तीन खासदारांचा समावेश आहे.

खा.सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
अमर पटनायक (BJD)
एन.के. प्रेमचंद्रन (रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी)
श्रीरंग आप्पा बारणे (संसद विशिष्ट रत्न पुरस्कार) (शिवसेना)
सौगता रॉय (तृणमूल काँग्रेस)
कुलदीप राय शर्मा (काँग्रेस)
विद्युत बरन महतो (भाजप)
हिना गावित (भाजप)
सुधीर गुप्ता (मध्य प्रदेश)

यांना 17 व्या लोकसभेतील कामगिरीबद्दल “संसद रत्न पुरस्कार” देण्यात येणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published.