नागपूर, दि.११ : नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणाऱ्या नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील दोन मार्गाचे लोकार्पण तसेच दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो विस्तारीकरण प्रकल्पाची पायाभरणी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खापरी मेट्रो स्थानकावर करण्यात आली.

याप्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार कृपाल तुमाने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.

प्रधानमंत्र्यांनी झिरो माईल मेट्रो ते खापरी मेट्रो स्थानका दरम्यान मेट्रोने प्रवास केला. यानंतर त्यांनी खापरी मेट्रो स्थानकाला नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्ग क्रमांक-२ व मार्ग क्रमांक-४ अंतर्गत ‘कस्तुरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौक’ आणि ‘कस्तुरचंद पार्क ते प्रजापती नगर मेट्रो स्थानक’ या मार्गांवरील मेट्रो वाहतूक सेवेचे लोकार्पण केले. या टप्प्यातील ४० कि.मी. मार्गावर ३६ मेट्रो स्थानकांचा समावेश असून या प्रकल्पासाठी ९३०० कोटींचा खर्च झाला आहे.

मेट्रो विस्तारीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ३२ स्थानकांचा समावेश आहे. हा टप्पा ४३.८ कि.मी. अंतराचा आहे. यासाठी ६७०० कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. यात उत्तरेकडे कन्हान, दक्षिणेला बुटीबोरी एमआयडीसी, पूर्वेला ट्रान्सपोर्ट नगर आणि पश्चिमेला हिंगणापर्यंत मेट्रोचा विस्तार होणार आहे. भविष्यात नागपूर शहरातील वाढत्या लोकसंख्येसाठी हा प्रकल्प मोलाचा ठरणार आहे.


खापरी मेट्रो स्थानक आणि मेट्रो ट्रेन सजविण्यात आली होती. याप्रसंगी मेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षीत, तसेच नागपूर मेट्रोचे अधिकारी सुनिल माथूर, अनिल कोकाटे, अतुल गाडगीळ, हरिंदर पांडे, उदय बोलवनकर आदी उपस्थित होते.