दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची चर्चा संपूर्ण देशात चालू आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केलीये.

आता विवेक अग्निहोत्री लवकरच त्यांचा पुढचा चित्रपट ‘द दिल्ली फाइल्स’ बनवणार असल्याचे समजत आहे. यासोबतच त्यांचा पुढच्या चित्रपटात कंगना राणौतला काम करणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर आता विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी एका मुलाखतीत सांगितले की, मी कंगनासोबत कोणताही चित्रपट करत नाहीये. तसेच, ते पुढे म्हणाले, “माझ्या चित्रपटांना स्टार्सची गरज नाही. त्यांना अभिनेते हवे आहेत. 12 वर्षांपूर्वी जेव्हा मी माझा प्रवास सुरू केला तेव्हा मी ठरवले होते की मी माझ्याच प्रकारचे चित्रपट बनवणार आणि मी स्टार चित्रपट करणार नाही. सिनेमा हे लेखक-दिग्दर्शकांसाठी एक माध्यम आहे, असं माझं मत आहे.”

एका वृत्तानुसार विवेक अग्निहोत्री ब्रिटिश संसदेला भेट देणार आहेत. ब्रिटीश पक्षाने विवेक आणि त्याची पत्नी पल्लवी जोशी यांना निमंत्रण पाठवले आहे. यासंबंधी विवेक अग्निहोत्री म्हणाले, “बरोबर आहे, माझी पत्नी पल्लवी आणि मला ब्रिटिश संसदेत आमंत्रित करण्यात आले आहे. पुढच्या महिन्यात आपण तिथे जाऊ. काश्मिर पंडितांच्या नरसंहाराचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याच्या स्पष्ट उद्देशाने काश्मीर फाइल्सची निर्मिती करण्यात आली. आम्ही तिथे पोहोचलो याचा मला आनंद आहे.”

दरम्यान, ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने गेल्या 19 दिवसांत 234 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट 11 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटावरून बराच वाद निर्माण झाला आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात मुळे समाजात दोन गट पडलेलं दिसत आहेत. विवेक अग्निहोत्री यांनी अर्ध सत्य सांगून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून केलं असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *