ठाणे शहरांतर्गत मेट्रोच्या आखणीमध्ये बाधित होत असलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्याबाबत शहराचे महापौर, नगरविकास विभागाचे सचिव तसेच महामेट्रोचे कार्यकारी संचालक यांच्या समन्वय समितीत निर्णय घेण्यात येईल.

या समितीच्या बैठकीत स्थानिक संबंधित लोकप्रतिनिधींना देखील निमंत्रित करण्यात येईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सांगितले. हा विषय रहिवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने विधान परिषद सभापतींच्या दालनात सर्व संबंधित लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात यावी, असे निर्देश तालिका सभापती प्रसाद लाड यांनी दिले.

ठाणे शहरात अंतर्गत मेट्रोचा प्रस्ताव मंजूर होण्यापूर्वीच जुन्या इमारतींच्या बांधकामांना मंजुरी नाकारण्याचे प्रकार ठाणे महापालिकेकडून सुरू असल्याने मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीच्या प्रश्नाबाबत विधान परिषद सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी यासंबंधी लक्षवेधी सूचना मांडली होती.

याबाबत झालेल्या चर्चेत नागपूर येथील महामेट्रोशी संबंधित कर्मचाऱ्यांना कंत्राटदार कंपनी वेळेवर वेतन देत नसल्याची बाब सदस्य प्रवीण दटके यांनी लक्षात आणून दिली. यावर संबंधित ग्रेट वॉल या कंपनीकडून आता वेळेवर वेतन देण्यात येत असल्याचे मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

सदस्य अभिजित वंजारी यांनी देखील चर्चेत सहभाग घेत प्रवाशांच्या सोयीसाठी नागपूर मेट्रोच्या पुढील टप्प्यांना लवकर मंजुरी मिळावी, अशी मागणी केली.