बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई नगर परिषदेतील गैरप्रकारांत दोषी आढळणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्या नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, अंबाजोगाई नगर परिषदेतील गैरप्रकारांची उपायुक्त नगर प्रशासन यांच्या मार्फत चौकशी करण्यात आली आहे. त्यांनी सदरच्या कामात प्रशासकीय आणि वित्तीय अनियमितता झाली असल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यानुसार अंबाजोगाई नगर परिषदेतील गणेश सरोदे आणि अशोक साबळे या दोन वर्ग दोनच्या अधिकारी आणि उदय दीक्षित आणि अजय कस्तुरे या कर्मचारी यांच्या विभागीय चौकशी करण्यात येणार आहेत.

या विभागीय चौकशी सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येतील आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. याबाबत सदस्य प्रशांत बंब यांनी उपप्रश्न उपस्थित केला होता.