नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले असेल पण जेव्हा जेव्हा भारताचा पराभव होतो तेव्हा तो सोशल मीडियावर ट्रेंड करायला लागतो. धोनी संघात असता तर संघाचा पराभव झाला नसता, असा दावा त्याचे चाहते करू लागले आहेत. दरम्यान, तो आणखी एका कारणाने ट्रेंड झाला. धोनी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कर्णधार म्हणून तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा एकमेव क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले असले तरी त्याच्याकडे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतचा धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून काही युजर्सना प्रश्न पडला होता की धोनी राजकारणात येत आहे का?

व्हायरल फोटोमध्ये धोनी अमित शहासोबत हस्तांदोलन करताना दिसत आहे. चेन्नईमध्ये एका कार्यक्रमादरम्यान दोघांची भेट झाली. निमित्त होते BCCI चे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांच्या मालकीच्या इंडिया सिमेंट्सच्या 75 व्या वर्धापन दिनाचे. श्रीनिवासन हे आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जचेही मालक आहेत.

17 हजारांहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा

41 वर्षीय धोनीने आपल्या कारकिर्दीत देशवासियांना सेलिब्रेशनचे अनेक प्रसंग दिले. टीम इंडियाने 2007 मध्ये T20 विश्वचषक, 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 मध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफी त्यांच्या नेतृत्वाखाली जिंकली. धोनीने आपल्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.