जिल्हा परिषद कृषी विभागाने आतपासून खरीप हंगामाची तयारी सुरू केली असून पेरणी होणार्या संभाव्य क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. यानूसार जिल्ह्यात खरीपसाठी 8 लाख 38 हजार 946 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.
खरीप हंगामात प्रामुख्याने जिल्ह्यात बाजारी, सोयाबीन आणि कपाशीचे क्षेत्र अधिक असून दक्षिण जिल्ह्यात मूग, उडिद यासह अन्य कडधान्य पिकांना प्राधान्य देण्यात येते. सुरूवातीचा दमदार पाऊस झाल्यास कडधान्य पिकांची पेरणी 15 जूनपर्यंत पूर्ण होते.
नगर जिल्हा रब्बी हंगामाचा जिल्हा आहे. मात्र, अलिकडच्या काही वर्षात मान्सून पूर्व आणि सुरूवातीच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने खरीप हंगामाचे चित्र बदलले आहे. जिल्ह्यात खरिपासाठी 70 हजार 21 क्विंटल बियाणाची मागणी कृषी विभागाने कृषी आयुक्तालयाकडे केली आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र हे 4 लाख 47 हजार 904 हेक्टर क्षेत्र असून 2021 ला प्रत्यक्षात 8 लाख 9 हजार हेक्टर पेरणी झाली होती. यंदा त्या संभाव्या वाढ करण्यात आली असून यंदा पावसाने साथ दिल्यास जिल्ह्यात 8 हजार 38 हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
दरम्यान कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये खरीप हंगामासाठी 7 लाख 14 हजार 453, 2020 मध्ये 8 लाख 38 हजार 621 आणि 2021 मध्ये 8 लाख 9 हजार 13 हेक्टरवर खरीप हंगामासाठी पेरणी झाली होती. प्रत्यक्षात झालेल्या पेरणीच्या आधारे पुढील हंगामाची पेरणी होणार्या क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले.