नवी दिल्ली : T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून 10 गडी राखून झालेल्या पराभवानंतर ही मोठी ICC ट्रॉफी जिंकण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा भंगले. T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीतून भारतीय संघ बाहेर पडल्यानंतर BCCI कारवाईच्या मूडमध्ये आहे. आगामी काळात भारतीय क्रिकेट संघात अनेक मोठे बदल होणार आहेत.

भारतीय क्रिकेट संघात सर्वात मोठा बदल घडणार, तो म्हणजे महेंद्रसिंग धोनीचे पुनरागमन. बीसीसीआयच्या एका सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, प्रशिक्षक राहुल द्रविडपेक्षा महेंद्रसिंग धोनीला भारतीय क्रिकेट संघात मोठे स्थान मिळू शकते. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी कोचिंगची जबाबदारी विभागली जाईल. अशा परिस्थितीत बीसीसीआय महेंद्रसिंग धोनीची ‘क्रिकेट संचालक’ म्हणून नियुक्ती करू शकते.

महेंद्रसिंग धोनीने आपल्या नेतृत्वाखाली भारताला वनडे आणि टी-२० मध्ये प्रत्येकी एक विश्वचषक जिंकून दिला आहे. 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने T20 विश्वचषक जिंकला होता. यानंतर टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वाखाली २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषकही जिंकला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपदही जिंकले होते. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2009 साली जगातील नंबर 1 टेस्ट टीम बनली होती.

विश्वचषकासारखी मोठी स्पर्धा कशी जिंकली जाते याचा अनुभव महेंद्रसिंग धोनीला आहे. अशा परिस्थितीत आता टीम इंडियाला महेंद्रसिंग धोनीच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा मिळावा, विशेषत: 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी बीसीसीआयची इच्छा आहे. 2023 चा एकदिवसीय विश्वचषक पुढील वर्षी भारतातच होणार आहे. महेंद्रसिंग धोनीबाबत या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो. महेंद्रसिंग धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.