महाअपडेट टीम : लघु आणि मध्यम उद्योग केंद्रीय कॅबिनेट मंत्री व भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव सरकार पडणार असल्याच्या वर्तवलेल्या भाकितावर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी नारायण राणेंना खोचक टोला लगावला आहे.

भाजप नेते राणे यांनी महाराष्ट्रातील सध्याचे राष्ट्रवादी – शिवसेना – काँग्रेस आघाडीचे महाआघाडी सरकार पुढील वर्षी मार्चमध्ये पडणार असल्याचे भाकीत केलं त्यावर नवाब मलिक यांनी राणेंचा खरपूस समाचार घेत म्हंटल की, कोंबडं, बोकडं ठेऊन नवस केल्याने सरकार पडतही नाही अन् बनतही नाही, हे तर आधी भविष्यवाणी करत होते आता तर भाजपचे नेते नवसांनं सरकार पडण्याचा प्रयत्न करत आहे, अशी स्वप्नं पाहून सरकार पडत नसतं….

नवाब मलिक म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर हे सरकार काही महिन्यांत पडेल, असं भाकीत सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांनी केले होतं. यानंतर भाजपने तेच म्हणण्याची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर दिली. फडणवीस किंवा पाटील यांचं भाकीत खरं ठरलं नसल्याने आता ही जबाबदारी नारायण राणेंकडे सोपवली आहे.

मलिक पुढे म्हणाले, नारायण राणे हे 23 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रीपदासाठी ते काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी खूप काही केलं पण ते मुख्यमंत्री झाले नाही. आता ते आमच्या सरकारसाठी भाकीत करत आहेत पण भाकित, स्वप्न, प्रार्थना करून सरकार पडत नाही हे त्यांनी समजून घ्यायला हवं.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या वक्तव्यावरही नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षांनी महाराष्ट्रातील सरकार उलथवून टाकणार असल्याचे म्हटलं होतं. ”सरकार हटवता येत नाही… आणि स्थापनही होऊ शकत नाही, सरकार हे जनतेच्या इच्छेने बनतं. आमचे आमदार घाबरलेले नसून महाराष्ट्रात हे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचं नाही, तर 25 वर्षांसाठीचं आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे ?

राज्यातील महाविकास आघाडी सरकार मार्चपर्यंत पडेल आणि भाजपचं सरकार स्थापन होईल, असा दावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं.

ही सध्या गुपित गोष्ट असून मला ते आत्ताच बाहेर काढायचं नाहीये, असे भाजप नेते राणे म्हणाले होते. सरकार बनवायचं असेल किंवा पडायचं असेल तर काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *