महाअपडेट टीम :- कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येला आता ब्रेक लागला असून आता सर्व प्रकारचे निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. आता या दरम्यान रेल्वे प्रशासनाने आता सामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.
रेल्वेने सर्व विशेष गाड्या हटवून सामान्य वाहतूक सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सर्व रेल्वे गाड्याही पूर्ण क्षमतेने धावू लागल्या आहेत. मध्य रेल्वेने आता प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेने जारी केलेल्या आदेशानुसार, आता प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपयांऐवजी 10 रुपये करण्यात आलं आहे. आदेशानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, (CSMT) , दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत आता 10 रुपये करण्यात आली आहे. हा आदेश 25 नोव्हेंबरपासून लागू झाला आहे.
रेल्वे प्रवाशांना सरकारकडून मोठं गिफ्ट :-
कोरोनाच्या वेळी प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांची संख्या कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात वाढ करण्यात आली होती. दर पाच पटीने वाढल्यानंतर फलाटावरील प्रवाशांची संख्या खूपच कमी झाली होती. मात्र, ती कमी करण्याची मागणीही लोकांकडून उठत होती.
जेव्हा कोविडची परिस्थिती सुधारू लागली, तेव्हा भारतीय रेल्वेने हळूहळू गाड्या सोडण्यास सुरुवात केली आणि सर्व गाड्यांचे क्रमांक विशेष श्रेणीमध्ये बदलले गेले. यासोबतच रेल्वे तिकिटांच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.
सरकारनं केटरिंगही केलं सुरु :-
कोरोना महामारीमुळे भारतीय रेल्वेने गाड्यांमधील केटरिंग सुविधा बंद केली होती. आता ही सुविधा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. रेल्वेने फक्त काही गाड्यांसाठी केटरिंग सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाने बुधवारी सांगितले की, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत, तेजस आणि गतिमान गाड्यांची केटरिंग सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.