महाअपडेट टीम, 25 जानेवारी 2022 : आज मंगळवारी सकाळी अतिशय वेदनादायक अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मेडिकलच्या विद्यार्थ्यांची कार पुलावरून खाली पडल्याने मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायला हॉस्टेलच्या बाहेर पडलेल्या या विद्यार्थ्यांना आपण पुन्हा जिवंत परत येऊ शकणार नाही, अशी निघताना पुसटीशी कल्पना नसेल.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व जण दवेली येथून महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात जात होते. मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश 20 ते 35 वयोगटातील असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतदेहांना वर्धा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्व मृतदेहांचे पोस्टमार्टम केले जाणार आहे. मध्यरात्री हा अपघात झाला असून विद्यार्थ्यांची कार थेट 40 फूट खोल दरीत कोसळल्याने हा मोठा अपघात झाला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमदार विजयभाऊ रहांगडाले यांचे पुत्र अविष्कार रहांगडाले, नीरज चौहान, नितेश सिंग, विवेक नंदन, प्रत्युष सिंग, शुभम जैस्वाल आणि पवन शक्ती अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

काल रात्री साडेअकराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. तेव्हा मेडिकलच्या विद्यार्थ्याची गाडी अचानक रस्त्यापासून 40 फूट खोल दरीत कोसळली.

गाडीचं स्पीड तब्बल 140 km असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने सेलसुरा गावाजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. गावाजवळील नदीच्या पुलावरून कार अचानक खाली पडली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विद्यार्थ्यांचे वय 25 ते 35 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे.

सर्व मृत विद्यार्थी वर्धा जिल्ह्यातील सांगवी मेघे वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती, की कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी तब्बल चार तासांचा अवधी लागला.

सेलसुराजवळ झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएमएनआरएफकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींना 50,000 रुपये दिले जातील, असे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले.

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *