मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलाच्या गालाचा मुका एका तरुणांने सात वर्षांपूर्वी घेतला होता. तब्बल सात वर्षांनी आरोपीला मुंबईतील मेट्रोपोलिटीन मॅजिस्ट्रेट न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
आरोपीचे नाव किरण सुझा होनावर असून, तो गोव्यातील पणजी येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीला जेलची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
जाणून घ्या सविस्तर प्रकरण याबाबत अधिक माहिती अशी , 23 ऑगस्ट 2015 रोजी एक महिला प्रवासी आपल्या मित्रांसोबत हार्बर मार्गावरील गोवंडी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन असा प्रवास करत होती.
लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 1 वर आली असता, किरण सुझा होनावर (37) याने त्या महिला प्रवासीच्या उजव्या गालाचा मुका घेवून लज्जा उत्पन्न करुन विनयभंग केला होता.
त्यानंतर, पीडित महिलेने याबाबत सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात तात्काळ तक्रार दाखल केली होती. लोहमार्ग पोलिसांनी पीडित महिलेचा जबाब नोंदवून आरोपी विरोधात गुन्हा नोंदविला होता.
तब्बल सात वर्ष हा खटला न्यायालयात सुरु होता. सर्व साक्षीदारांची तपासणी झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीस 1 वर्षे सश्रम कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.