Kieron Pollard
Kieron Pollard will be replaced by the new West Indies captain

मुंबई : क्रिकेट वेस्ट इंडीजने (CWI) निकोलस पूरनची (Nicholas Pooran) वेस्ट इंडिजचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय कर्णधार म्हणून नेमणूक केल्याची पुष्टी केली आहे. किरॉन पोलार्डने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

गेल्या वर्षी, पूरन वेस्ट इंडिजच्या एकदिवसीय आणि टी-20 संघांचा उपकर्णधार होता आणि आता तो संघाचे कर्णधारपद सांभाळेल. दरम्यान, शाई होपची वनडे संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

निकोलस पूरनची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आल्या नंतर क्रिकेट वेस्ट इंडीजचे संचालक जिमी अॅडम्स म्हणाले, “आमचा विश्वास आहे की निकोल्सचा अनुभव, कामगिरी आणि संघात असलेला आदर पाहता तो ही जबाबदारी उत्तम पार पाडेल. पूरन आता कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारण्यासाठी परिपक्व झाला आहे. जगातील विविध फ्रँचायझी आधारित लीगमध्ये खेळण्याचा त्याचा अनुभवही त्याच्या कर्णधारपदाचा महत्त्वाचा घटक आहे.”

निकोलस पूरनने याआधी वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व केले आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेदरम्यान त्याने संघाची धुरा सांभाळली होती. त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 8 अर्धशतके आणि एक शतक आहे.

याशिवाय त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 8 अर्धशतकेही झळकावली आहेत. किरॉन पोलार्डने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. यानंतर विंडीज संघाचे कर्णधारपद रिक्त झाले होते. किरॉन पोलार्ड सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसत आहे. येथेच त्याने निवृत्ती जाहीर केली.

Leave a comment

Your email address will not be published.