मुंबई : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली दीर्घकाळ खराब फॉर्मशी झगडत होता. पण पाकिस्तानविरुद्ध त्याने काही शानदार फटके मारले. आता भारताचे माजी दिग्गज कपिल देव यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. विराट कोहलीला फॉर्ममध्ये यायला जास्त वेळ लागणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. विराट कोहलीला गेल्या तीन वर्षांपासून क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावता आलेले नाही.

एएनआयशी बोलताना कपिल देव म्हणाले की, त्याला परत येताना पाहून बरे वाटले. मी काही शॉट्स पाहिले जिथे त्याने खरोखर प्रभाव पाडला. माझी इच्छा आहे की त्याला याबद्दल अधिक खात्री असावी. आजपासूनच नाही तर गेली दहा वर्षांपासून मला विराटचा खेळ आवडतो. यामुळे तो इतर कोणापेक्षाही मोठा खेळाडू ठरतो.

पुढे बोलताना कपिल देव म्हणाले की, तो कोणत्याही गोष्टीपेक्षा खूप मोठा आहे. कोणत्याही खेळाडूला प्रत्येक सामन्यात धावा मिळणार नाहीत. कोणत्याही खेळाडूला प्रत्येक सामन्यात शून्य मिळणार नाही. मला वाटते की त्याची क्षमता, त्याची प्रतिभा, त्याला पुन्हा फॉर्ममध्ये येण्यासाठी इतका वेळ लागू नये. फक्त एका मोठ्या खेळीची प्रतीक्षा आहे. ती लवकरच येईल.

पाकिस्तानविरुद्ध विक्रम केला

1983 विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांनी सुचवले की विराट कोहलीला हे समजून घेणे आवश्यक आहे की चढ-उतार हे खेळाडूच्या कारकिर्दीचा भाग असतात. पाकिस्तानविरुद्ध विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही.