मुंबई : साऊथ फिल्म इंडस्ट्री सध्या चर्चेत आहे. एकीकडे पुष्पा, KGF 2 आणि RRR सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यामुळे, तर दुसरीकडे त्यांच्या कलाकारांची नावे सतत वादात येत आहेत. नुकतेच मल्याळम चित्रपट निर्माते सनल कुमार शसीधरन यांना लैंगिक शोषण प्रकरणात अटक झाल्याची बातमी समोर आली होती.
आता आणखी एक साऊथ अभिनेता कायद्याच्या कचाट्यात सापडल्याचे दिसत आहे. झाले असे की, सैदापेट न्यायालयाने चेन्नई पोलिसांना अभिनेता सुरिया, त्याची पत्नी ज्योतिका आणि जय भीमचे दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.
वास्तविक रुद्र वन्नियार सेना नावाच्या वन्नियार गटाने या तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. ‘जय भीम’ चित्रपटातील अनेक दृश्यांमुळे वन्नियार समाजाची प्रतिमा मलिन होत असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते. याच समाजाने चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी ‘जय भीम’वर बंदी घालण्याची मागणीही केली होती.
चित्रपटातून आक्षेपार्ह दृश्ये काढून टाकावीत, अशी त्यांची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले. रुद्र वन्नियार सेनेनेही ‘जय भीम’ चित्रपटाच्या टीमकडून 5 कोटी रुपये नुकसानभरपाई आणि बिनशर्त माफीची मागणी केली होती.
‘जय भीम’ 2 नोव्हेंबर 2021 रोजी OTT वर रिलीज झाला होता. अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे लोकांनी खूप कौतुक केले. एवढेच नाही तर हा चित्रपट ऑस्करसाठीही पाठवण्यात आला होता. हा चित्रपट इरुलर समुदायाच्या सदस्यांच्या कोठडीतील छळावर आधारित होता. रिलीजपूर्वीच हा चित्रपट खूप वादात सापडला होता.
हिंदी भाषिकांनाही ‘जय भीम’च्या एका सीनमुळे खूप त्रास झाला. चित्रपटाच्या एका दृश्यात प्रकाश राज एका व्यक्तीला हिंदीत बोलल्याबद्दल थप्पड मारताना दिसत होते. यानंतर या सीनवर बराच गदारोळ झाला होता. चित्रपटातून असा सीन काढून टाकण्याची मागणीही लोकांनी केली होती.