नवी दिल्ली : IPL 2023 च्या आधी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर 17 महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानात परतला आहे. जोफ्रा आर्चर हा अबुधाबी येथे इंग्लंड विरुद्ध इंग्लंड लायन्स संघाच्या तीन दिवसीय सामन्याचा भाग आहे. या सामन्यात जोफ्रा आर्चरने पुनरागमन केले आहे.

इंग्लंड संघाला 1 ते 21 डिसेंबर दरम्यान पाकिस्तानमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे आणि हा सामना त्या मालिकेसाठी सराव म्हणून आयोजित केला जात आहे. यावेळी जोफ्रा आर्चर ज्या पद्धतीने गोलंदाजी करताना दिसतो आहे त्यावरून तो लवकरच इंग्लंड संघातही पुनरागमन करताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

आर्चरने मार्च 2021 मध्ये इंग्लंडकडून शेवटचा सामना खेळला होता. जुलै 2021 मध्ये त्याने शेवटचा स्पर्धात्मक सामना खेळला होता. यानंतर आर्चर दुखापतीचा बळी ठरला. आणि बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिला.

2021 पासून दुखापतीने त्रस्त असलेल्या जोफ्रा आर्चरला मुंबई इंडियन्सने मेगा लिलावात मोठी रक्कम देऊन विकत घेतले होते. मुंबई इंडियन्सला माहित होते की तो आयपीएल 2022 मध्ये खेळू शकणार नाही. तरीही, मुंबई फ्रँचायझीने मोठी रक्कम देऊन त्याला सांघात घेतले आणि आयपीएल 2023 साठी देखील मुंबई इंडियन्सने आर्चरला कायम ठेवले आहे. वास्तविक, फ्रँचायझीने म्हटले होते की जोफ्रा ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. जर जोफ्रा आयपीएल 2023 मध्ये परतला तर मुंबई इंडियन्सला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.