मुंबई : महेंद्रसिंग धोनी 40 वर्षांचा आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण धोनी अजूनही आयपीएल खेळत आहे. दोन वर्षांपासून धोनी आयपीएलमधून कधी निवृत्त होणार, हाच प्रश्न वारंवार समोर येत आहे.
एक दिवस अगोदर जेव्हा तो चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध परतला तेव्हा त्याला भविष्यात आयपीएल खेळण्याबाबत हाच प्रश्न विचारण्यात आला होता.
नाणेफेकीच्या वेळी समालोचक डॅनी मॉरिसनने धोनीला विचारले की, “मी दोन वर्षांपूर्वी हाच प्रश्न विचारला होता की पुढच्या वर्षीही आम्ही तुला पिवळ्या जर्सीत पाहू का? यावर धोनीने हसून उत्तर दिले. तो म्हणाला की, मागच्या वेळीही मी पिवळ्या जर्सीत दिसणार असल्याचे सांगितले होते. पण ती पिवळी जर्सी असेल की दुसरी, त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागेल.”
महेंद्रसिंग धोनीच्या या वक्तव्यावरून अनेक अर्थ काढले जात आहेत. कारण धोनी 40 वर्षांचा आहे. या वर्षीही मेगा लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने रवींद्र जडेजाला पहिला खेळाडू म्हणून कायम ठेवला आणि नंतर त्याला संघाचा कर्णधार बनवले, तेव्हा धोनीचा हा शेवटचा हंगाम असू शकतो, अशी अटकळ बांधली जात होती.
पण जडेजाच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2022 मध्ये चेन्नईला गतविजेत्या दर्जाप्रमाणे कामगिरी करता आली नाही. पहिल्या 8 पैकी 6 सामन्यात संघाचा पराभव झाला. अशा परिस्थितीत धोनीकडे पुन्हा संघाची कमान सोपवण्यात आली.
धोनी CSKचा कर्णधार म्हणून कायम राहणार का?
आता फक्त याच आयपीएलसाठी धोनीला पुन्हा कर्णधार बनवण्यात आलंय की पुढच्या वर्षीही माही त्याच भूमिकेत दिसणार? ते अजून स्पष्ट झालेले नाही. पण यापुढेही मी पिवळ्या जर्सीतच दिसणार असल्याचे संकेत त्याने दिले आहेत. यावरून तो चेन्नई सुपर किंग्जशी जोडला जाईल, अशी अपेक्षा आहे. पण त्यांची भूमिका बदलू शकते आणि ती काय असेल? यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.
धोनी पुन्हा चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रथम, CSK चा पुढचा कर्णधार कोण असेल? धोनी 2023 मध्ये संघाचा कर्णधार राहील का आणि जडेजाला काढून टाकण्याचा निर्णय योग्य होता का?
MS Dhoni Is An Emotion! 💛
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2022
Thala is back to lead @ChennaiIPL once again!
Follow the match 👉 https://t.co/8IteJVPMqJ#TATAIPL | #SRHvCSK pic.twitter.com/XV9OAd1OB2
चेन्नई सुपर किंग्जमधील धोनी, जडेजा यांच्यानंतर अनुभवी खेळाडूंचा विचार केला तर त्यात ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायडू आणि रॉबिन उथप्पा यांची नावे येतात. पण वय त्यांच्या कर्णधार होण्याच्या मार्गात येऊ शकते. ब्राव्हो 38 वर्षांचा आहे, अंबाती आणि उथप्पा देखील 36-36 वर्षांचे आहेत. अशा परिस्थितीत सीएसके व्यवस्थापन या तिघांपैकी कोणाकडेही भावी कर्णधार म्हणून पाहत आहे, असे वाटत नाही.