मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या 50 व्या लीग सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादशी (Sunrisers Hyderabad) झाला. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson)नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या डावात फलंदाजी करताना पॉवेल आणि वॉर्नरच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर दिल्लीच्या संघाने 20 षटकांत 3 बाद 207 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ 8 विकेट्सवर 186 धावाच करू शकला.
हैदराबादचा सलग तिसरा पराभव
हैदराबादची पहिली विकेट अभिषेक शर्माच्या रूपाने पडली आणि तो 7 धावांवर कुलदीप यादवच्या हातून खलील अहमदकडे झेलबाद झाला. कर्णधार केनने 5 धावा केल्या आणि त्याला नॉर्टजेने बाद केले. शार्दुल ठाकूरने फॉर्मात असलेल्या राहुल त्रिपाठीला 22 धावांवर बाद करून हैदराबाद संघाला मोठा धक्का दिला. मिचेल मार्शने त्याचा झेल घेतला. खलील अहमदने 42 धावांच्या स्कोअरवर कुलदीपच्या हातून एडन मार्करामला झेलबाद करून संघाला महत्त्वाचे यश मिळवून दिले.
शार्दुलच्या चेंडूवर अवघ्या 10 धावा करून शशांकने आपली विकेट गमावली. यानंतर शीन अॅबोट 7 धावा करून परतला. संघाला सर्वात मोठा धक्का शार्दुलने दिला जेव्हा त्याने निकोलस पूरनला 62 धावांवर रोव्हमन पॉवेलच्या हाती झेलबाद केले. पूरनने 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि 6 षटकार मारून तो बाद झाला.
दिल्लीचा डाव
या सामन्यात पृथ्वी शॉच्या जागी मनदीप सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती, पण तो फ्लॉप ठरला त्याने 5 चेंडूंचा सामना केला आणि शून्य धावांवर आपली विकेट गमावली. मनदीप सिंगला पूरनच्या हाती भुवीने झेलबाद केले. मिशेल मार्शला शॉन अॅबॉटने त्याच्याच चेंडूवर 10 धावांवर झेलबाद केले. कर्णधार ऋषभ पंतने 26 धावांची झटपट खेळी केली, पण श्रेयस गोपालने त्याला बोल्ड केले.
वॉर्नरने 34 चेंडूत चौकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने 58 चेंडूत 3 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने नाबाद 92 धावा केल्या, तर पॉवेलने 35 चेंडूत 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 67 धावा केल्या. हैदराबादकडून भुवी, अॅबॉट आणि गोपाल यांना प्रत्येकी एक यश मिळाले. उमरान मलिकने 4 षटकात 52 धावा दिल्या आणि त्याला यश मिळाले नाही.