वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी बुधवारी मोठी बातमी समोर आली आहे. त्यांचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. किरॉन पोलार्ड सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. त्याच्या अशा निवृत्तीची चाहत्यांना अपेक्षा नव्हती. पोलार्डने व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली.

किरॉन पोलार्डने 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, 123 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि 101 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन शतके आणि 55 बळी घेतले आहेत, तर टी-20 मध्ये त्याने 75* ची सर्वोच्च धावसंख्या आणि 25 धावांत 4 विकेट्स मिळवल्या.

त्याने दोन्ही फॉरमॅटमध्ये वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व केले आणि 2012 ICC T20 विश्वचषक विजेत्या संघाचाही भाग होता. त्याने सप्टेंबर 2019 मध्ये जेसन होल्डरकडून मर्यादित षटकांच्या संघाची सूत्रे हाती घेतली होती.

पोलार्डने आपल्या व्हिडिओमध्ये म्हंटले आहे की, मी 10 वर्षांचा होतो तेव्हा वेस्ट इंडिजकडून खेळणे हे माझे स्वप्न होते. एकदिवसीय आणि टी-20 मध्ये 15 वर्षे वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केल्याचा मला अभिमान आहे. बराच विचार केल्यानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला आहे.

आयपीएलच्या या हंगामात मुंबई इंडियन्सने किरॉन पोलार्डला कायम ठेवले होते. मात्र, तो अजूनही अपेक्षेप्रमाणे खेळू शकलेला नाही. पोलार्ड बॅटने झगडताना दिसला आहे. येत्या सामन्यांमध्ये त्याची कामगिरी पाहण्यासारखी असेल. मुंबई संघाला आतापर्यंत झालेल्या सर्व 6 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा स्थितीत आगामी सर्व सामने महत्त्वाचे ठरणार आहेत.

Leave a comment

Your email address will not be published.