मुंबई : राजस्थान रॉयल्स (आरआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. सामन्याच्या पहिल्या डावात रियान पराग आणि हर्षल पटेल यांच्यात वाद झाला.
क्रिकेटमध्ये आपण दोन खेळाडूंना मैदानावर एकमेकांशी वाद घालताना अनेकदा पाहिलं आहे, पण या दोन खेळाडूंमधील हा वाद इथेच संपला नाही. सामना संपल्यानंतर हर्षल पटेलने असे काही केले ज्यामुळे खेळाचा अवमान झाला.
राजस्थान रॉयल्सच्या (RR) डावाच्या शेवटच्या षटकात रियान परागने हर्षल पटेलच्या चेंडूवर दोन षटकार ठोकल्याने वाद सुरू झाला. राजस्थान रॉयल्सचा डाव संपल्यानंतर रियान पराग डगआऊटकडे जाऊ लागला तेव्हा हर्षल पटेलने त्याला काहीतरी सांगितले. रियाननेही मागे वळून हर्षल पटेलला उत्तर दिल्यावर दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. मात्र, राजस्थान संघाच्या एका सपोर्ट स्टाफने परागला जाण्यास सांगितले आणि हर्षलला पकडून प्रकरण शांत केले.
क्रिकेटमध्ये, सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू नेहमीच हस्तांदोलन करतात. या सामन्यानंतर असेच काहीसे घडले, सामना संपल्यानंतर हर्षल पटेलने सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन केले, मात्र तो रियान परागशी हात न मिळवता निघून गेला. रियान परागने हात पुढे केला होता, पण हर्षल पटेलने त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून गेला. हर्षल पटेल याने असे कृत्य करून खेळाचा अवमान केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
रियान परागने 31 चेंडूंत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 56 धावा केल्या. या मोसमातील रियान परागचे हे पहिले अर्धशतक होते. प्रथम फलंदाजी करताना रियान परागच्या शानदार खेळीच्या जोरावर राजस्थानने 20 षटकांत 8 गडी गमावून 144 धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगळुरूचा संघ 19.3 षटकात 115 धावा करत सर्वबाद झाला आणि 29 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.