मुंबई : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जची (CSK) कामगिरी खराब झाली आहे. सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यातील पराभवासह, संघाचा हा सलग चौथा पराभव आहे. सनरायझर्स हैदराबादकडून चेन्नईला 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर रवींद्र जडेजाने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

रवींद्र जडेजा म्हणाला की, “आम्ही ज्या प्रकारची सुरुवात पाहत होतो, ती झाली नाही. आम्ही 20 ते 25 धावांनी कमी होतो. सुरुवातीला आमचे गोलंदाज चांगल्या भागात चेंडू टाकून विकेट घेण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही आता दोन्ही विभागांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही सर्व व्यावसायिक क्रिकेटपटू आहोत, आम्हाला आमच्या खेळावर कठोर परिश्रम करावे लागतील, एकत्र राहून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करावा लागेल.”

सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्य ठरला. सलामीवीर फलंदाज रॉबिन उथप्पा 15 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. ऋतुराज गायकवाडही 16 धावा करून बाद झाला. यानंतर मोईन अलीने क्रीजवर खेळताना चेन्नई संघासाठी धावा केल्या. वेगवान खेळ करत तो 35 चेंडूत 48 धावा करून बाद झाला. इतर सर्व फलंदाज फ्लॉप ठरले. कर्णधार रवींद्र जडेजा 23 आणि रायडूने 27 धावा करून बाद झाला. अशा प्रकारे चेन्नईच्या संघाला 7 विकेट्सवर 154 धावा करता आल्या.

प्रत्युत्तरात खेळताना अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन यांनी हैदराबादकडून वेगवान फलंदाजी केली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली. केन विल्यमसन 32 धावा करून बाद झाला. अभिषेक शर्माने जलद 50 चेंडूत 75 धावा केल्या. राहुल त्रिपाठीने 15 चेंडूत नाबाद 39 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. अशा प्रकारे हैदराबादने चेन्नईवर 8 विकेट्सने मात केली.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *