मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या 52 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) पंजाब किंग्जशी (Punjab Kings) सामना झाला. या सामन्यात पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवालने (Mayank Agarwal) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

पंजाब संघाने पहिल्या डावात बेअरस्टोच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकात 5 गडी गमावत 189 धावा केल्या आणि राजस्थानला सामना जिंकण्यासाठी 190 धावांचे लक्ष्य दिले.

राजस्थानने 19.4 षटकांत 4 बाद 190 धावा केल्या आणि सामना सहा विकेटने जिंकला. या विजयासह राजस्थानचे 14 गुण झाले असून हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने ६८ धावा केल्या आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

राजस्थानचा डाव

जोस बटलरने 30 धावा केल्या आणि रबाडाने त्याला राजपक्षेच्या हाती झेलबाद केले. ऋषी धवनने कर्णधार संजू सॅमसनला 23 धावांवर धवनच्या हाती झेलबाद केले. यशस्वी जैस्वालने 33 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्याने 41 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 68 धावांची खेळी केली.

त्याला अर्शदीप सिंगने लिव्हिंगस्टोनच्या हाती झेलबाद केले. अर्शदीप सिंगच्या चेंडूवर देवदत्त पडिक्कल ३१ धावांवर बाद झाला. यानंतर हेटमायरने 16 चेंडूत नाबाद 31 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

पंजाबचा डाव

पंजाबचा सलामीवीर शिखर धवनची बॅट राजस्थानविरुद्ध चालली नाही आणि 12 धावा करून आर अश्विनच्या चेंडूवर तो जोस बटलरच्या हाती झेलबाद झाला. भानुका राजपक्षे 18 चेंडूत 27 धावा करत चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. या सामन्यात कर्णधार मयंक अग्रवालने 15 धावा केल्या आणि तो चहलच्या चेंडूवर बटलरच्या हाती झेलबाद झाला.

बेअरस्टोने 34 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि या सामन्यात 40 चेंडूत 56 धावा करून तो चहलच्या चेंडूवर बाद झाला. प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर लियाम लिव्हिंगस्टोनने 22 धावा केल्या.

जितेश शर्माने नाबाद 38 तर ऋषी धवनने नाबाद 5 धावांची खेळी केली. त्याचवेळी राजस्थानकडून चहलने 3 बळी घेतले आणि तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

या सामन्यासाठी पंजाब संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नसला तरी राजस्थान संघात बदल करण्यात आला होता. या सामन्यात करुण नायरच्या जागी यशस्वी जैस्वालचे पुनरागमन झाले.

Leave a comment

Your email address will not be published.