मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या मोसमात रविवारी दिल्ली कॅपिटल्स संघाला लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या मोसमातील दोन्ही संघांची ही दुसरी टक्कर होती, मागील सामन्यातही लखनऊने बाजी मारली होती. या सामन्यात केवळ 5 धावा करून बाद झालेल्या दिल्लीच्या सलामीवीराला दंड ठोठावण्यात आला.
रविवारी खेळल्या गेलेल्या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात कर्णधार केएल राहुल आणि दीपक हुडाच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनऊने 3 गडी गमावून 193 धावा केल्या.
प्रत्युत्तरात दिल्लीच्या संघाला 7 गडी गमावून 189 धावांपर्यंत मजल मारता आली आणि सामना 6 धावांच्या फरकाने सामना गमवावा लागला. या विजयानंतर लखनऊचे 7 विजयांतून 14 गुण झाले आणि त्यांनी प्लेऑफसाठीचा दावा मजबूत केला.
या हंगामाच्या सुरुवातीपासूनच स्पर्धेतील सर्व 10 संघांचे खेळाडू आणि कर्णधारांवर कडक नजर ठेवण्यात येत आहे. निर्धारित वेळेत षटकांचा कोटा पूर्ण न केल्यामुळे अनेक कर्णधारांना मॅच फीच्या 25 % दंड ठोठावण्यात आला आहे.
त्याचबरोबर खेळाडूंनी पंचांविरुद्ध केलेल्या चुकीच्या वागणुकीबद्दलही त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. दिल्लीचा सलामीवीर पृथ्वीला रविवारी लखनऊविरुद्धच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल फटकारण्यात आले आणि पंचांनी त्याच्या मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावला.
दिल्लीच्या सलामीवीराने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.2 अन्वये ‘लेव्हल वन’ चा गुन्हा आणि संबंधित दंड स्वीकारला आहे, असे आयपीएलकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आचारसंहितेच्या ‘लेव्हल वन’चे उल्लंघन करणारा सामनाधिकारींचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. लेव्हल वनचा गुन्हा पंच किंवा विरोधी संघाकडे आक्रमक हावभावांशी संबंधित आहे.