मुंबई : आयुष बडोनी फलंदाजीला आला तेव्हा लखनऊ सुपर जायंट्सला 5 चेंडूत 5 धावा करायच्या होत्या. या धावा जरी कमी असल्या, तरी या युवा फलंदाजावर दडपण होते. दिल्लीचा वरिष्ठ गोलंदाज शार्दुल ठाकूरने पहिल्या चेंडूवर बडोनीला धावा काढू दिल्या नाहीत. त्यामुळे सामना अधिकच रोमांचक झाला. पण 22 वर्षीय युवा फलंदाजाने अगदी शांतपणे याचा सामना केला. त्याने तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. तो 3 चेंडूत 10 धावा करून नाबाद राहिला.आयपीएल 2022 च्या 4 सामन्यांमधला हा लखनऊचा तिसरा विजय आहे.
आयुष बडोनीने ज्या प्रकारे षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला, त्यावरून सगळेच त्याची तुलना धोनीशी करत आहेत. धोनी मॅच फिनिशिंगसाठी ओळखला जातो. बडोनी आत्तापर्यंत 4 डावात दोनदा नाबाद राहिला आहे आणि दोन्ही वेळा त्याने संघासाठी विजयी धावा केल्या आहेत. यापूर्वी, त्याने सीएसकेविरुद्ध विजयी धावाही केल्या होत्या. त्यानंतर अखेरच्या षटकात संघाला 9 धावा करायच्या होत्या. बडोनीनेही 20व्या षटकात मुकेश चौधरीच्या चेंडूवर षटकार ठोकला. तो 9 चेंडूत 19 धावा आणि 2 षटकार ठोकून नाबाद राहिला.
याआधी दिल्लीचा रहिवासी असलेल्या आयुष बडोनीने गुजरात टायटन्सविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले होते. तो फलंदाजीला आला तेव्हा संघाची धावसंख्या 4 गडी बाद 29 धावा होती. यानंतर त्याने 41 चेंडूत 54 धावांची शानदार खेळी केली, यावेळी त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. मात्र, या सामन्यात संघाचा पराभव झाला. मात्र सर्वांनी त्याच्या खेळीचे खूप कौतुक केले.
एवढेच नाही तर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने 12 चेंडूत 19 धावांची खेळी केली. संघाने हा सामना 12 धावांच्या फरकाने जिंकला. दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर कर्णधार केएल राहुल म्हणाला की, बडोनीने चांगला खेळ दाखवला. हा त्याच्यासाठी मोठा धडा आहे. त्याने आतापर्यंत शानदार खेळ केला आहे.