मुबई : दिल्लीने कोलकाता नाईट रायडर्सचा 4 विकेट्सने पराभव केला आणि आयपीएलच्या 15 व्या हंगामातील श्रेयस अय्यरच्या संघाचा हा सलग पाचवा पराभव होता. सध्या, KKR ने 9 पैकी 6 सामने गमावले आहेत आणि हा संघ 6 गुणांसह 8 व्या क्रमांकावर आहे आणि संघर्ष करत आहे.
केकेआरला दिल्लीविरुद्ध अधिक धावा काढता आल्या नाहीत आणि कुलदीप यादवच्या गोलंदाजीसमोर संघ पूर्णपणे हतबल झाला. या सामन्यात केकेआरने 20 षटकांत 9 बाद 146 धावा केल्या आणि दिल्लीने 19 षटकांत 6 बाद 150 धावा करून सामना जिंकला.
दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने याचे कारण सांगितले आहे, कर्णधार म्हणाला की, “आम्ही खरोखरच संथ सुरुवात केली आणि सुरुवातीला विकेट्स गमावल्या, तसेच आम्ही बोर्डवर चांगली धावसंख्या मिळवू शकलो नाही. आम्ही कुठे चुकत आहोत, यावर लक्ष देऊन आम्ही सुधारणा करू, संघातील खेळाडूंनाही दुखापत होत असल्याने आम्ही योग्य संयोजन तयार करू शकलो नाही. आपण एक युनिट म्हणून एकत्र राहणे आवश्यक आहे तसेच काही निर्भय क्रिकेट खेळले पाहिजे.”
श्रेयस पुढे म्हणाला की, अजून पाच सामने बाकी आहेत आणि आता आपल्यावर विश्वास दाखवण्याची, चांगला खेळ करण्याची आणि संघ आणि व्यवस्थापनाला काहीतरी चांगले देण्याची वेळ आली आहे. केकेआरला आता काय करावे लागेल यावर तो म्हणाला, भूतकाळ विसरा आणि नव्याने सुरुवात करा. आपण आपले सर्वोत्कृष्ट देत आहोत तरीही आपण हरत आहोत, अशा परिस्थितीत आपण विचार करणे आवश्यक आहे की चूक कुठे होत आहे.
उमेश यादवने या सामन्याची सुरुवात एका विकेटने केली पण षटकात 11 धावा दिल्या आणि त्यामुळेच मला सामन्याचा वेग बदलल्याचे जाणवले. मात्र, या मोसमात त्याने आम्हाला खूप चांगले क्षण दिले आहेत आणि ते खूप प्रभावी ठरले आहेत.