सलग सहा पराभवानंतर बाहेर पडण्याच्या मार्गावर असलेला मुंबई इंडियन्स गुरुवारी येथे चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध विजय नोंदवून आयपीएलमधील आपल्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करेल. पाच वेळा चॅम्पियन मुंबईने या मोसमात एकही सामना जिंकलेला नाही आणि गुरुवारी हरल्यास संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. गतविजेत्या चेन्नईची स्थितीही चांगली नाही आणि पॉइंट टेबलमध्ये चेन्नई शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे. या संघाने सहा पैकी पाच सामने गमावले आहेत

मुंबईसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म, ज्याने सहा सामन्यांत केवळ 114 धावा केल्या आहेत. मुंबईला प्रथम खेळताना लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल किंवा मोठी धावसंख्या करायची असेल, तर रोहितला मोठी खेळी करावी लागेल. तरूण फलंदाज इशान किशनही त्याच्या लयीत दिसत नाही. या फलंदाजावर मुंबईने 15.25 कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याने सहा सामन्यांत दोन अर्धशतकांच्या मदतीने केवळ 191 धावा केल्या आहेत.

डेव्हाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी काही चांगल्या खेळी केल्या आहेत पण मधल्या फळीत जबाबदारी घेण्यासाठी त्यांना एकत्र येण्याची गरज आहे. अष्टपैलू किरॉन पोलार्डनेही आतापर्यंत निराश केले आहे. तो आतापर्यंतच्या प्रत्येक सामन्यात अपयशी ठरला असून त्याने केवळ 82 धावा केल्या आहेत. मुंबईकडे चांगली फलंदाजी आहे जी चेन्नईच्या तुलनेने कमी अनुभवी आक्रमणाचा सामना करू शकते.

मुंबईसाठी फलंदाजीपेक्षा गोलंदाजी हा चिंतेचा विषय आहे. जसप्रीत बुमराह वगळता इतर गोलंदाजांनी आतापर्यंत खराब कामगिरी केली आहे. टायमल मिल्स, जयदेव उनाडकट, बेसिल थंपी किंवा मुख्य फिरकीपटू मुरुगन अश्विन यांना आता सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. त्यांच्या शेवटच्या सामन्यात मिल्सने लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध तीन षटकांत 54 धावा दिल्या, तर उनाडकट आणि अश्विनने अनुक्रमे 32आणि 33धावा दिल्या.

चन्ने बद्दल बोलायचे झाले तर ऋतुराज गायकवाडचा फॉर्म चेन्नईसाठी सकारात्मक संकेत आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने 48 चेंडूत 73 धावा केल्या होत्या. रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध त्यांच्या आक्रमक फलंदाजीचे उत्तम उदाहरण मांडले. दुबेला अंबाती रायडू आणि मोईन अलीसह मधल्या फळीत अधिक जबाबदारी पेलण्याची गरज आहे.

कर्णधार रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी फिनिशरची भूमिका बजावू शकतात. जडेजा गोलंदाजीमध्ये फ्लॉप दिसत आहे आणि त्याच्या संघाला मुंबईच्या फलंदाजांना रोखायचे असेल तर त्याला चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. ड्वेन ब्राव्हो आणि फिरकीपटू महेश तीक्ष्णा वगळता चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली नाही. मुकेश चौधरी धावा देत आहे तर ख्रिस जॉर्डननेही गुजरातविरुद्ध 58 धावा दिल्या आहेत. दीपक चहर आणि अॅडम मिल्ने अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे चेन्नईची जबाबदारी या गोलंदाजांवर आहे.

Leave a comment

Your email address will not be published.