पुणे : आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 46 वा सामना रविवारी सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू झाला.
हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 2 गडी गमावून 202 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादला 20 षटकांत केवळ 189 धावाच करता आल्या. चेन्नईने हा सामना 13 धावांनी जिंकला. ऋतुराज गायकवाडला त्याच्या शानदार फलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या चेन्नईने चांगली सुरुवात केली. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी 182 धावांची भागीदारी केली. 18व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 57 चेंडूत 99 धावा काढून ऋतुराज झेलबाद झाला.
त्याचवेळी 20व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कर्णधार महेंद्रसिंग धोनी 7 चेंडूत 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कॉनवे 85 आणि रवींद्र जडेजा 1 धावावर नाबाद राहिले. हैदराबादकडून टी नटराजनने दोन्ही विकेट घेतल्या. दुसरीकडे उमरान मलिक चांगलाच महागात पडला. त्याने 4 षटकात 48 धावा दिल्या.
203 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली. अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन यांनी पहिल्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. शर्मा २४ चेंडूत ३९ धावा करून बाद झाला. पुढच्याच चेंडूवर राहुल त्रिपाठी खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.
10व्या षटकात एडन मार्कराम 17 धावांवर बाद झाला. यानंतर केन विल्यमसनने 47, शशांक सिंगने 15 आणि वॉशिंग्टन सुंदरने 2 धावा केल्या. निकोलस पूरन 64 आणि मार्को जॅन्सन 0 धावांवर नाबाद राहिले. चेन्नईकडून मुकेश चौधरीने 4 आणि मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियसने प्रत्येकी 1-1 खेळाडू आऊट केले.