चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज ब्रेबॉर्न स्टेडियमवर लढत होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ससमोर या मोसमातील पहिला विजय नोंदवण्याचे आव्हान असेल.

चेन्नईला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात कोलकात्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले तर दुसऱ्या सामन्यात 210 धावा करूनही लखनऊकडून पराभव स्वीकारावा लागला.

पहिल्या सामन्यात चेन्नईची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली होती, तर दुसऱ्या सामन्यात संघाला 200 पेक्षा जास्त धावांचा बचावही करता आला नाही. सलामीवीर ऋतुराजचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. दोन सामन्यांत त्याच्या नावावर फक्त 1 धाव आहे. या सामन्यात आपल्या कामगिरीने तो संघाचा विश्वास जिंकू शकेल, अशी आशा आहे.

चेन्नई संघाची दोन सामन्यांत चांगली सुरुवात झाली नाही. दोन्ही सामन्यात संघाची सलामीची जोडी वेगळी होती. मात्र, लखनऊविरुद्धच्या सामन्यात रॉबिन उथप्पाच्या फलंदाजीमुळे संघाला काहीसा दिलासा मिळाला. त्याने 50 धावांची इनिंग खेळली होती पण ऋतुराजची बॅट शांत होती.

मोईन अलीच्या आगमनामुळे संघाची मधली फळी मजबूत झाली आहे. याशिवाय मधल्या फळीत अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा आणि धोनीसारखे फिनिशर आहेत. मधल्या फळीतील फलंदाजीच्या जोरावर संघाने लखनऊविरुद्ध 210 धावा केल्या होत्या.

गेल्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या ड्वेन प्रिटोरियसने संघाच्या आशा उंचावल्या होत्या. डेथ ओव्हर्समध्ये त्याने शानदार गोलंदाजी केली. त्याला साथ देण्यासाठी संघाकडे ड्वेन ब्राव्हो आणि मोईन अलीच्या रूपात चांगले पर्याय आहेत. तुषार देशपांडेकडून संघाला चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असेल. या सामन्यात मुकेश चौधरीच्या जागी अॅडम मिल्नेचा समावेश केला जाऊ शकतो.

चेन्नईची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायुडू, एमएस धोनी (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (क), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, ड्वेन प्रिटोरियस, अॅडम मिल्ने, तुषार देशपांडे.

Leave a comment

Your email address will not be published.