गतविजेत्या सीएसकेला आयपीएलच्या 15 व्या मोसमातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली संघ सतत पराभूत होत असून पंजाब किंग्जविरुद्धही हा संघ ५४ धावांनी पराभूत झाला.

या सामन्यात शिवम दुबे वगळता सीएसकेच्या सर्व फलंदाजांनी पंजाब किंग्जच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली आणि संपूर्ण संघ 18 षटकांत 126 धावांवर गारद झाला. या लीगमधील धावांच्या बाबतीत चेन्नईचा हा दुसरा सर्वात मोठा पराभव ठरला. या सामन्यात चेन्नईला विजयासाठी 181 धावांचे लक्ष्य मिळाले होते.

पंजाब किंग्जविरुद्धच्या या पराभवानंतर संघाचा कर्णधार रवींद्र जडेजाने पराभवाचे कारण सांगितले, “आम्ही पॉवरप्लेमध्ये खूप विकेट गमावल्या आणि सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून आम्हाला जो वेग मिळायला हवा होता तो आम्हाला मिळाला नाही. आम्हाला सामन्यात परत येण्याचा मार्ग शोधण्याची गरज आहे.

संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड पुन्हा अपयशी ठरला आणि एका धावेवर बाद झाला. याबाबत जडेजाने सांगितले की, “आपण त्याला साथ देणे आणि त्याचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे. तो खूप चांगला फलंदाज आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे.”

रवींद्र जडेजा पुढे म्हणाले की, “आम्ही गायकवाडला पाठिंबा देत राहू आणि तो परत फॉर्मात येईल याची आम्हाला खात्री आहे. त्याचवेळी या सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या शिवम दुबेबद्दल जडेजा म्हणाला, “तो खूप चांगली फलंदाजी करत आहे आणि पंजाबविरुद्धही त्याची फलंदाजी उत्कृष्ट होती.

त्याची विचारसरणी सकारात्मक असली पाहिजे आणि ती खूप महत्त्वाची ठरेल. आम्ही निश्चितपणे आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू, कठोर परिश्रम करू आणि मजबूत पुनरागमन करू.”

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *