इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या मोसमात शुक्रवारी रात्री खेळल्या गेलेल्या सामन्यात बराच वाद पाहायला मिळाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघाचा दणदणीत पराभव झाला.

या सामन्यादरम्यान दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत, गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनी नो-बॉलवरून बराच वाद घातला. आता या सर्वांवर बीसीसीआयकडून कडक कारवाई करण्यात आली आहे.

आयपीएलच्या ३४व्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार राजस्थानविरुद्ध नो-बॉलचा वाद भडकवल्याप्रकरणी आणि सामन्यात अडथळा आणल्याप्रकरणी दोषी आढळला होता. यावर बीसीसीआय आणि आयपीएल आयोजन समितीने कारवाई करत त्याला दंड ठोठावला आहे. कर्णधारासोबतच संघाचा गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनाही दंड ठोठावण्यात आला आहे. हा वाद झाला तेव्हा प्रवीणही मैदानात पोहोचला होता. डगआऊटमधून मैदानावर गेल्यामुळे त्याच्यावर एका सामन्याची बंदीही घालण्यात आली आहे.

बीसीसीआयच्या वतीने नो-बॉलच्या वादानंतर कारवाई करत कर्णधार पंतला मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केला. या वादानंतर, त्याने आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम 2.7 च्या लेव्हल 2 चे उल्लंघन केल्याची कबुली मॅच रेफरीसमोर दिली.

दिल्लीचा गोलंदाज शार्दुलला त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. नो-बॉलच्या वादातही त्याने कर्णधाराचे समर्थन केले. कलम2.8 च्या लेव्हल 2चे उल्लंघन केल्याबद्दल तो दोषी आढळला.

ठाकूर यानेही कर्णधारासह त्याची शिक्षा मान्य केली. संघाचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण यांनाही मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलची आचारसंहिता मोडल्याप्रकरणी मॅच फीसोबतच प्रवीणवर एका सामन्याची बंदीही घालण्यात आली आहे. नो-बॉलचा वाद असताना तो सामना थांबवण्यासाठी मैदानात दाखल झाला होता आणि हे कलम 2.2 च्या लेव्हल 2 चे उल्लंघन आहे.

Leave a comment

Your email address will not be published.