सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनला काल राजस्थान रॉयल्सविरुद्ध ६१ धावांनी पराभव पत्करावा लागला. यासह कर्णधाराला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हैदराबादचा संघ निर्धारित वेळेत 20 षटके टाकू शकला नाही, त्यामुळे विल्यमसनला दंड ठोठावण्यात आला आहे.
आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्लो ओव्हर-रेटची ही संघाची पहिली चूक आहे, त्यामुळे हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मालाही १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 210 धावा केल्या. सामनावीर कर्णधार संजू सॅमसनने 27 चेंडूत 55 धावांची तुफानी खेळी केली.
प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादला 7 गडी गमावून 149 धावाच करता आल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या एडन मार्करामने 41 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 57 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने 14 चेंडूत 40 धावा केल्या. गोलंदाजीत राजस्थानकडून युझवेंद्र चहलने तीन, प्रसिद्ध कृष्णा आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी दोन बळी घेतले.