मुंबई : टी 20 लीग आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सर्वोच्च परिषदेच्या बैठकीनंतर बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या अंतिम आणि प्लेऑफ सामन्यांचे ठिकाण आणि तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. IPL-2022 चे प्लेऑफ आणि फायनल कोलकाता आणि अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आले आहेत.
IPL-2022 चा पहिला क्वालिफायर 24 मे रोजी तर एलिमिनेटर सामना 26 मे रोजी होणार आहे. दोन्ही सामने कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहेत. दुसरा क्वालिफायर 27मे रोजी आणि अंतिम सामना 29 मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “आयपीएलच्या बाद फेरीतील सामने कोलकाता आणि अहमदाबादमध्ये आयोजित केले जातील.”
आयपीएलच्या 2022 हंगामात आतापर्यंत 36 सामने खेळले गेले आहेत. गुजरात टायटन्स हा नवा संघ 7 पैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वल आहे. दुसऱ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबाद आहे, ज्याने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजस्थान रॉयल्स आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचेही 10-10 गुण आहेत. पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने आतापर्यंतचे सातही सामने गमावले असून त्यांच्या विजयाचे खातेही उघडलेले नाही.