नवी दिल्ली : भारतीय संघाने त्यांच्या गट सामन्यात पाकिस्तान आणि हाँगकाँगचा पराभव केला, परंतु त्यानंतर सुपर -4 मध्ये कथा बदलली. सुपर-4 सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. आता आज (6 सप्टेंबर) भारतीय संघाचा सामना श्रीलंकेच्या संघाशी होणार आहे. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा संघाच्या प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल करू शकतो. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियामध्ये अनेक मोठे बदल होऊ शकतात.

ही सलामीची जोडी असू शकते

कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामीच्या जोडीने पाकिस्तानविरुद्ध धमाका दाखवला. या दोघांनी मिळून ५० हून अधिक धावांची भागीदारी केली होती. त्याचवेळी पॉवरप्लेमध्ये या दोघांनी मिळून पाकिस्तानी संघाचा धुव्वा उडवला. यानंतर विराट कोहलीने झंझावाती खेळी करताना 60 धावांची खेळी केली. अशा स्थितीत श्रीलंकेविरुद्ध हे तिन्ही फलंदाज खेळणार हे निश्चित आहे.

मधल्या फळीत बदल होऊ शकतात

पाकिस्तानविरुद्ध मधल्या फळीतील फलंदाज खराब फ्लॉप ठरले. सूर्यकुमार यादवने केवळ 13 धावा केल्या. त्याचबरोबर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला त्याच्या नावाप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. चुकीचा फटका खेळून तो बाद झाला. त्याने 10 धावा केल्या. अशा स्थितीत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याच्या जागी दिनेश कार्तिकचा समावेश केला जाऊ शकतो. त्याचवेळी हार्दिक पांड्याला सहाव्या क्रमांकावर आजमावले जाऊ शकते. अष्टपैलू खेळाडूची जबाबदारी दीपक हुडा याच्याकडे सोपवली जाऊ शकते.

गोलंदाजीत होणार फेरबदल!

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रवी बिश्नोई वगळता सर्व गोलंदाजांनी अत्यंत खराब कामगिरी केली. या गोलंदाजांविरुद्ध पाकिस्तानी फलंदाजांनी भरपूर धावा केल्या. स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल चांगलाच महागात पडला. त्याने चार षटकात 43 धावा दिल्या आणि फक्त एक विकेट घेऊ शकला. अशा स्थितीत त्याच्या जागी रविचंद्रन अश्विनचा समावेश केला जाऊ शकतो. भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांना आणखी एक संधी दिली जाऊ शकते.

श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, रवी बिश्वोई, रविचंद्रन अश्विन.