नवी दिल्ली : टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पुढील सामना रविवारी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. भारतीय संघाने गुरुवारी नेदरलँड्सचा 56 धावांनी पराभव केला आणि टीम इंडियाचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. यासह टीम इंडियाने पॉइंट टेबलमध्ये आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. मेलबर्नमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला होता. सध्या टीम इंडिया 2 सामन्यांत 4 गुणांसह ग्रुप-2 मध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने गुरुवारी बांगलादेशविरुद्ध मोठा विजय नोंदवला. दक्षिण आफ्रिकेचा पहिला सामना झिम्बाब्वेसोबत असला तरी तो सामना पावसामुळे वाहून गेला होता. आफ्रिकेचा फलंदाज रिले रुसो उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याला रोखणे हे भारतीय गोलंदाजांसमोर मोठे आव्हान असेल. बांगलादेशविरुद्ध शतक झळकावून त्याने आपले इरादे व्यक्त केले आहेत.

दरम्यान, रविवारी पर्थ येथे होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत खरा सामना भारतीय फलंदाज आणि दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांमध्ये होईल, असा विश्वास दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुसनर याने व्यक्त केला आहे. भारत दोन विजयांसह गट II मध्ये अव्वल आहे, तर दक्षिण आफ्रिकेचे तीन गुण आहेत आणि ते दुसऱ्या स्थानावर आहे. क्लुसनर म्हणाले, ‘‘आम्ही पर्थमध्ये आणखी एक वेगवान गोलंदाज पाहू शकतो. गेल्या सामन्यात तबरेझ शम्सीने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यामुळे मी खरोखर प्रभावित झालो आहे. तो विकेट घेणारा गोलंदाज आहे.

क्लुसनर म्हणाले, ‘ड्वेन प्रिटोरियसच्या दुखापतीमुळे त्याचा संबंध संघाच्या संतुलनात झालेल्या बदलाशी आहे. या सामन्यात भारतीय फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांना कसे सामोरे जातात हे पाहणे रंजक ठरेल.” विश्वचषकावर पावसाचा परिणाम होणे दुर्दैवी आहे. हा अवकाळी पाऊस आहे त्यामुळे माझी खरोखरच थोडी निराशा झाली आहे. हा विश्वचषक त्याच्या चढ-उतारांसाठीही ओळखला जाणार आहे. छोट्या संघांनी काही मोठ्या संघांना पराभूत केले आहे.

रविवारी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका यांच्यात महत्त्वाचा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता उभय संघांमधील सामना सुरू होईल. टी20 विश्वचषक 2022 चा हा 30 वा सामना असेल, तर भारतीय संघ पर्थमध्ये पहिला सामना खेळणार आहे. जर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यात यशस्वी ठरला तर टीम इंडिया ग्रुप 2 मध्ये अव्वल स्थानावर राहील. पण जर दक्षिण आफ्रिकेचा संघ जिंकला तर तो पहिल्या क्रमांकावर येईल.

सध्या झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांचे प्रत्येकी 3 गुण आहेत, मात्र उत्तम नेट रनरेटमुळे दक्षिण आफ्रिका भारतीय संघानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.