मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची आगामी टी-20 मालिका भारतीय संघासाठी खूप खास असणार आहे. वास्तविक, 9 जूनपासून सुरू होणाऱ्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताला इतिहास रचण्याची संधी आहे.

संघ 9 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळणार आहे. हा सामना दिल्लीत खेळवला जाणार असून हा सामना जिंकल्यानंतर भारत सलग सर्वाधिक सामने जिंकणारा पहिला संघ बनेल.

सध्या, संघाने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सलग 12 विजय नोंदवले आहेत आणि ते अफगाणिस्तानच्या बरोबरीने उभे आहेत. त्यामुळे या मोठ्या क्षणाचा भाग बनून या महत्त्वाच्या सामन्यात संघाला विजयाकडे नेण्याची केएल राहुलकडे उत्तम संधी आहे.

भारतीय संघाने यापूर्वी न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध मालिका जिंकल्या आहेत. संघाने प्रथम न्यूझीलंडचा 3-0, नंतर वेस्ट इंडिजचा 3-0 आणि श्रीलंकेचा 3-0 असा पराभव करून क्लीन स्वीप केला होता. या तीन देशांविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाचा पराभव केला होता.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची मालिका 9 जूनपासून सुरू होत आहे. दुसरा टी-20 सामना 12 जून रोजी कटक येथील बाराबती स्टेडियमवर, तिसरा टी-20 सामना 14 जून रोजी विशाखापट्टणम, चौथा टी-20 सामना 17 जून रोजी राजकोट येथे आणि शेवटचा टी-20 सामना 19 जून रोजी बेंगळुरू येथे होणार आहे.

या दौऱ्यात विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे तर उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांना पदार्पणाची संधी मिळाली आहे.