नवी दिल्ली : यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया नवा वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यास मुकली आहे. टी-20 मालिकेतील (IND vs SA) पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा 7 गडी राखून पराभव केला. अशा प्रकारे, संघ सलग 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्यापासून एक पाऊल मागे होता. भारत, अफगाणिस्तान आणि रोमानियाने आता संयुक्तपणे सलग 12 टी-20 सामने जिंकले आहेत.

या सामन्यात प्रथम खेळताना भारताने 4 गडी गमावत 211 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मधली ही संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 19.1 षटकांत 3 बाद 212 धावा करून सामना जिंकला. डेव्हिड मिलर आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन या दोघांनीही नाबाद अर्धशतकं ठोकली. श्रेयस अय्यरने डुसेनचा सोपा कॅच सोडला, हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.

टीम इंडियाने नोव्हेंबर 2021 पासून टी-20 मध्ये अजिंक्य क्रमाची मालिका सुरू केली आणि यादरम्यान टीमने 6 देशांना पराभूत केले होते. संघाने प्रथम अफगाणिस्तानवर 66 धावांनी विजय नोंदवला. त्यानंतर स्कॉटलंडचा 8 गडी राखून तर नामिबियाचा 9 गडी राखून पराभव केला. यानंतर संघाने न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत क्लीन स्वीप केला. आता दिल्लीत भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाल्याने ही मालिका खंडित झाली आहे.

29 धावांवर सोपा कॅच सोडला

दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या 30 चेंडूत 74 धावा करायच्या होत्या. 16व्या षटकासाठी वेगवान गोलंदाज आवेश खान आला. पहिल्या चेंडूवर मिलरने धाव घेतली. पुढच्या बॉलवर व्हॅन डुसेनने डीप मिडविकेटवर शॉट मारला. मात्र, श्रेयस अय्यरला त्याचा सोपा झेल पकडता आला नाही. त्यावेळी तो 30 चेंडूत 29 धावा करत खेळत होता. यानंतर पुढच्या 16 चेंडूत 46 धावा करत विजय निश्चित केला. तो 46 चेंडूत 75 धावा करून नाबाद राहिला. यावेळी त्याने 7 चौकार आणि 5 षटकार मारले. डेव्हिड मिलरने 31 चेंडूत 64 धावा केल्यानंतर नाबाद होता. यावेळी त्याने 4 चौकार आणि 5 षटकार मारले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 10.3 षटकांत नाबाद 131 धावांची भागीदारी केली.

रोहितने 9 सामन्यात विजय मिळवला

ज्या 12 सामन्यांमध्ये टीम इंडियाने बाजी मारली आहे. त्यात 2 कर्णधारांचे योगदान आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने 9 टी-20 सामने जिंकले आहेत. त्याचवेळी विराट कोहलीने 3 सामन्यात विजय मिळवला होता. तत्पूर्वी, टीम इंडियासाठी इशान किशनने शानदार फलंदाजी केली. त्याने 48 चेंडूत 76 धावा केल्या. याशिवाय श्रेयस अय्यरने 36 आणि हार्दिक पांड्याने 12 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या.