नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. पाठदुखीच्या तक्रारीमुळे तो पहिला सामना खेळू शकला नाही. शुक्रवारी निवडकर्त्यांनी या मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी बुमराहऐवजी मोहम्मद सिराजला संघात संधी दिली.

यापूर्वी, बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने असेही वृत्त दिले होते की बुमराह देखील स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. मात्र, याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतूनच पुनरागमन केले आहे. या मालिकेतील पहिला टी-२० तो मोहालीत खेळला नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात बुमराह मैदानात उतरला. पण, गोलंदाजीत काही विशेष दाखवू शकला नाही. त्याने 2 सामन्यात फक्त एक विकेट घेतली. यापूर्वी पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह आशिया कप-2022 खेळू शकला नव्हता.

सिराजने फेब्रुवारीमध्ये धर्मशाला येथे श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने 5 टी-20 मध्ये 10.45 च्या इकॉनॉमी रेटने पाच विकेट घेतल्या आहेत. टी-20 विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातही सिराजचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आलेला नव्हता. निवड समितीने मोहम्मद शमी आणि दीपक चहर यांची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड केली आहे. बुमराह टी-20 विश्वचषकातून बाहेर पडल्यास सिराज राखीव खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाला जाणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.