नवी दिल्ली : रविवारी झालेल्या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात (IND vs SA ) दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा 4 गडी राखून पराभव केला. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यासह दक्षिण आफ्रिकेने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

कटक येथील बाराबती स्टेडियमवर भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावा केल्या, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 18.2 षटकांत 6 गडी गमावून लक्ष्य गाठले. पराभवानंतर कर्णधाराने याचे कारण सांगितले आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने 81 धावांची शानदार खेळी केली. क्लासेनने 46 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकार ठोकले आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याच्याशिवाय कर्णधार टेंबा बावुमाने 30 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकारासह 30 धावा केल्या, तर डेव्हिड मिलर 15 चेंडूंत 20 धावा करून नाबाद परतला.

सामन्यानंतर कर्णधार ऋषभ पंत म्हणाला, “आम्ही 10-15 धावा कमी करू शकलो. भुवी (भुवनेश्वर कुमार) आणि वेगवान गोलंदाजांनी पहिल्या 7-8 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली पण त्यानंतर आम्ही काही चांगली कामगिरी केली नाही. दुसऱ्या हाफमध्ये आम्हाला विकेट्सची गरज होती, पण त्या विकेट आम्हाला मिळवता आल्या नाहीत.

पंत पुढे म्हणाला, “क्लासेन आणि बावुमा यांनी खरोखरच चांगली बॅटिंग केली. आम्ही आणखी चांगली बॉलिंग करू शकलो असतो, आशा आहे की पुढच्या सामन्यात आम्ही सुधारणा करू. आम्हाला आता उर्वरित तीन सामने जिंकायचे आहेत. भारतीय संघासाठी भुवनेश्वर कुमारने दमदार कामगिरी करत 4 षटकात केवळ 13 धावा देत 4 विकेट घेतल्या. त्यांच्याशिवाय युजवेंद्र चहल आणि हर्षल पटेल यांनी 1-1 विकेट घेतली.