नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका (INS VS SA) यांच्यातील पाच टी-20 मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (14 जून) विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिले दोन सामने गमावलेल्या टीम इंडियासाठी हा सामना करो किंवा मरोचा आहे. या सामन्यात हरल्यास मालिकाही गमवावी लागेल.
या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला इतिहास रचण्याची संधी आहे. इतिहास रचण्यापासून तो फक्त एक विकेट दूर आहे. तिसऱ्या टी-20 पॉवरप्लेमध्ये एक विकेट घेताच भुवनेश्वरच्या नावावर नोंद होईल. पॉवरप्लेमध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनेल.
सध्या तो वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सॅम्युअल बद्रीसह संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहे. बद्री आणि भुवनेश्वर यांनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पॉवरप्लेमध्ये 33-33 विकेट घेतल्या आहेत. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीच्याही तेवढ्याच विकेट्स आहेत.
तिसऱ्या टी-20 पॉवरप्लेमध्ये आणखी 1 विकेट घेताच भुवनेश्वर बद्री आणि सौदीच्या पुढे जाईल. भुवनेश्वरने 59 डावात 33 विकेट घेतल्या आहेत. तर बद्रीने 50 डावात इतक्या विकेट्स घेतल्या आहेत.
भुवनेश्वर कुमारने कटकमधील दुसऱ्या टी-20 सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याने या सामन्यात एकूण 4 विकेट घेतल्या आणि पॉवरप्लेच्या पहिल्या 6 षटकांमध्ये म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या डावात तीन विकेट घेतल्या.
मात्र, या सामन्यात त्याला दुसऱ्या टोकाकडून कोणत्याही गोलंदाजाची साथ मिळाली नाही आणि भुवनेश्वरच्या 30 धावांच्या आत दक्षिण आफ्रिकेच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवूनही भारतीय संघ हा सामना आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दुसरा सामना जिंकू शकला नाही.
या मालिकेतील 2 सामन्यांनंतर भुवनेश्वरच्या नावावर सर्वाधिक 5 विकेट आहेत. त्याने या विकेट्स 11 च्या सरासरीने घेतल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेटही 10 आहे. म्हणजेच प्रत्येक 10व्या चेंडूवर भुवी एक विकेट घेत आहे.