नवी दिल्ली : हार्दिक पांड्याचा अष्टपैलू खेळ (३-२५ आणि नाबाद ३३) आणि भुवनेश्वर कुमारच्या (४-२६) उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारताने २०२२ च्या आशिया चषक स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पाच विकेट्सनी पराभव केला. पाकिस्तानच्या 147 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने 2 बॉल बाकी असताना 5 विकेट्स गमावून विजय मिळवला. यासह भारताने गेल्या वर्षी याच मैदानावर टी-२० विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि डावाच्या दुसऱ्या चेंडूवर केएल राहुल बाद झाला. यानंतर रोहित शर्मा आणि कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. पण पुढच्या तीन धावांतच भारताला दोन धक्के बसले. रोहित शर्माने 18 चेंडूत 12 धावा केल्या तर कोहलीने 34 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 35 धावा केल्या.

रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्याने पाचव्या विकेटसाठी ६० धावांची विजयी भागीदारी केली. जडेजाने 29 चेंडूंत 35 धावा केल्या, ज्यात त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. दुसरीकडे, पांड्याने 17 चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 33 धावा केल्या.

तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 19.5 षटकांत सर्वबाद 147 धावांवर आटोपला. मोहम्मद रिजवानने सर्वाधिक 43 धावा केल्या, इफ्तिकार अहमदने 28 धावा आणि शाहनवाद दहनी 19 धावा केल्या.

भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. याशिवाय हार्दिक पांड्याने तीन, अर्शदीप सिंगने दोन आणि आवेश खानने एक विकेट आपल्या खात्यात जमा केली.