नवी दिल्ली : काल संपलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करणारा अष्टपैलू हार्दिक पंड्याने वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नाही. त्यानंतर या निर्णयावर सातत्याने चर्चा झाली, तसेच प्रश्नही उपस्थित करण्यात आले. उमरान मलिक आणि संजू सॅमसन यांना एकाही सामन्यात संधी देण्यात आली नाही.

उमरान मलिक आणि संजू सॅमसन यांना टी-20 मालिकेत संधी का देण्यात आली नाही?

न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका 1-0 ने जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत एकाही सामन्यात वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनला का खेळवले नाही, यावर प्रतिक्रिया दिली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर पत्रकार परिषदेत पत्रकारांनीही हार्दिक पांड्याला हाच प्रश्न विचारला.

या प्रश्नाला उत्तर देताना हार्दिक पांड्या म्हणाला, “बाहेरून कोण काय म्हणतंय याने आम्हाला काही फरक पडत नाही. ही माझी टीम आहे. प्रशिक्षक आणि मला जे योग्य वाटेल ते निर्णय घेतले जातील. अजून बराच वेळ असून सर्वांना संधी दिली जाईल. जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तुम्हाला दीर्घ संधी मिळेल. कर्णधार या नात्याने मला खेळाडूंना जेवढे स्वातंत्र्य देता येईन तेवढे स्वातंत्र्य देईन.

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत कर्णधार हार्दिक पंड्याने ऋषभ पंतला सलामीला संधी दिली, पण तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. असे असतानाही यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनला एकाही सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आली नाही. ऋषभ पंतला न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यात सलामीची संधी देण्यात आली होती, मात्र त्याने केवळ 6 आणि 11 धावा केल्या.