नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना नेपियर येथे खेळला गेला. पावसामुळे हा सामना डकवर्थ लुईस नियमानुसार बरोबरीत सुटला, यासह टीम इंडियाने ही मालिका 1-0 ने जिंकून इतिहास रचला. या मालिकेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा भारतीय संघ खेळत होता. या दौऱ्यात विराट कोहली-रोहित शर्मासारख्या बड्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती.

टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

उभय संघांमधील हा सामना पावसामुळे उशिरा सुरू झाला आणि नाणेफेकही उशिराने झाली. 161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पावसामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा टीम इंडियाने 4 विकेट गमावत 75 धावा केल्या होत्या. दीपक हुडा 9 आणि हार्दिक पंड्या 30 धावांवर खेळत होते. भारताला विजयासाठी 66 चेंडूत 86 धावा हव्या होत्या, पण त्यापलीकडे हा सामना खेळता आला नाही आणि सामना अनिर्णित राहिला. या मालिकेतील पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला होता.

न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच केला असा पराक्रम

ही मालिका जिंकून टीम इंडियाने मोठा विक्रम केला आहे. भारताने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच सलग दुसरी टी-20 मालिका जिंकली आहे. याआधी टीम इंडियाने 2020-21 च्या दौऱ्यावरही टी-20 मालिका जिंकली होती. या मालिकेत दोन्ही संघांमध्ये 5 सामने खेळले गेले आणि पाचही सामने टीम इंडियाच्या नावावर होते.

अर्शदीप-सिराजचा कहर

वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांच्या प्रत्येकी चार विकेट्समुळे भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडला 19.4 षटकात 160 धावांत गुंडाळले. यजमानांनी शेवटच्या 30 धावांत आठ विकेट गमावल्या. 16व्या षटकात न्यूझीलंडची धावसंख्या दोन बाद 130 अशी होती, पण अर्शदीप (37 धावांत 4 विकेट) आणि सिराज (17 धावांत 4 विकेट) यांनी शानदार पुनरागमन करत न्यूझीलंड संघाला दोन चेंडू शिल्लक असतानाच गुंडाळले.