नवी दिल्ली : T20 विश्वचषक 2022 मध्ये मिळालेली निराशा मागे टाकत भारतीय संघ न्यूझीलंडशी दोन-दोन हात करण्यास सज्ज झाला आहे. 18 नोव्हेंबरपासून उभय संघांमधील तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू होत आहे. प्रतिष्ठेच्या मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजता वेलिंग्टन येथे खेळवला जाईल.

या रोमांचक सामन्यात स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवकडून लोकांना मोठ्या आशा आहेत. यादवची बॅट चालली तर तो एक विशेष कामगिरीही आपल्या नावावर करेल. सूर्यकुमार यादवने यावर्षी भारतीय संघासाठी 29 सामने खेळले असून, 29 डावात 43.33 च्या सरासरीने 1040 धावा केल्या आहेत. जर त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत आणखी 286 धावा केल्या तर तो एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या पाकिस्तानी सलामीवीर मोहम्मद रिझवानला मागे टाकेल.

सध्या टी-20 क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोहम्मद रिझवानच्या नावावर आहे. 2021 मध्ये 29 सामने खेळताना रिजवानने 26 डावांमध्ये 73.66 च्या सरासरीने 1326 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक शतक आणि 12 अर्धशतकं झळकली. दरम्यान, त्याचा स्ट्राइक 134.89 इतका होता.

सूर्यकुमार यादवने भारतीय संघासाठी क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये 40 सामने खेळताना 38 डावांमध्ये 41.42 च्या सरासरीने 1284 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक शतक आणि 12 अर्धशतके झळकली आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यादवचा स्ट्राइक रेट 179.08 आहे.