नवी दिल्ली : न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून अचानक एका खेळाडूला वगळण्यात आले आहे. या खेळाडूने गेल्या महिन्यात टीम इंडियासाठी शेवटच्या एकदिवसीय सामन्यात स्वबळावर सामना जिंकून दिला आणि ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार आपल्या नावे केला. अशातच न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कर्णधार बनलेल्या शिखर धवनच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, त्याने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून या मॅचविनर खेळाडूला कसे वगळले.

टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवनने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले आहे. कुलदीप यादव हा तोच फिरकी गोलंदाज आहे, ज्याने गेल्या महिन्यात 11 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला स्वबळावर जिंकून दिले होते. टीम इंडियाचा ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्या एकदिवसीय सामन्यात 4.1 षटकात 18 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्यावेळी कुलदीप यादवची ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून निवड करण्यात आली होती.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्यानंतर आता 25 नोव्हेंबरला टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामना खेळत आहे. कर्णधार शिखर धवनने ‘चायनामन’ फिरकीपटू कुलदीप यादवला शेवटच्या सामन्यात दमदार कामगिरी करूनही प्लेइंग इलेव्हनमधून वगळले आणि त्याच्या जागी युझवेंद्र चहलला संघात घेतले आहे. या सामन्यात कुलदीप यादव खेळावा अशी चाहत्यांची इच्छा होती, पण याउलट तो अशा गोलंदाजाला संधी देत ​​आहे ज्याची गेल्या काही सामन्यांमध्ये कामगिरी फ्लॉप ठरली आहे.

कुलदीप यादवचा फॉर्म आणि त्याच्या गोलंदाजीतील वैविध्य पाहता, तो टीम इंडियासाठी २०२३चा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक खेळण्यास पात्र आहे. अशा परिस्थितीत त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त संधी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. कुलदीप यादवची गोलंदाजी युझवेंद्र चहलपेक्षा अधिक घातक ठरत आहे. कुलदीप यादवला खेळवणे हे विरोधी संघाच्या फलंदाजांसाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नाही.