नवी दिल्ली : अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्यापैकी कोणाला न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या टी-20 मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळते यावर मोठा प्रतिसाद दिला आहे. या मालिकेत श्रेयस अय्यरला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळावी आणि सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावे, असे त्याने म्हटले आहे.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी हार्दिक पांड्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. या दौऱ्यासाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. श्रेयस अय्यर, उमरान मलिक, संजू सॅमसन, इशान किशन या खेळाडूंचा न्यूझीलंड दौऱ्यावर समावेश करण्यात आला आहे. श्रेयस अय्यरच्या आगमनामुळे तिसऱ्या क्रमांकासाठी सूर्यकुमार यादवशी त्याची चुरशीची लढत होऊ शकते.

श्रेयस अय्यरने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे : अश्विन

मात्र, अश्विनच्या मते सूर्यकुमार यादवने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवे आणि श्रेयस अय्यरने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी. त्याच्या यूट्यूब चॅनलवर संवाद साधताना अश्विन म्हणाला, श्रेयस अय्यरबद्दल बोलायचे झाले तर तो तिसऱ्या क्रमांकावर तर सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळायला हवा.

सूर्यकुमार यादवला तिसर्‍या क्रमांकावर पाठवण्याची चर्चा होईल पण माझ्या मते श्रेयस अय्यरला त्या स्थानावर असायला हवे. श्रेयस तिसऱ्या क्रमांकावर तर सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. ऋषभ पंतला टॉप ऑर्डरमध्ये पाठवल्यास मधल्या फळीत एकही डावखुरा फलंदाज उरणार नाही. टी-20 मध्ये मधल्या फळीत डावखुरा फलंदाज असणे खूप महत्त्वाचे आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वेलिंग्टन येथे होणारा पहिला T20 सामना रद्द करण्यात आला आहे. पावसामुळे सामना होऊ शकला नाही. आता टी-20 मालिकेत फक्त दोन सामने शिल्लक आहेत.