नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा 14 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी तंदुरुस्त होण्याची शक्यता नाही. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार. टीम इंडियाकडे स्पिनर म्हणून आधीच तीन पर्याय आहेत.

संघात ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन, डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल आणि चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आहेत. अशा परिस्थितीत चौथ्या स्पेशालिस्ट स्पिनरची निवड क्वचितच होईल. संघ व्यवस्थापनाने जडेजासारख्या अष्टपैलू फिरकी गोलंदाजाची निवड न केल्यास भारत अ संघाचा गोलंदाज सौरभ कुमार हा एक उत्तम पर्याय असू शकतो.

टीम इंडियाला बांगलादेश दौऱ्यात दोन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एक मजबूत संघ या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर 14-18 डिसेंबर दरम्यान चितगाव आणि 22-26 डिसेंबर दरम्यान मीरपूर येथे दोन कसोटी सामने खेळणार आहे. UAE मध्ये झालेल्या आशिया कप दरम्यान रवींद्र जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याला अनिश्चित काळासाठी संघाबाहेर ठेवण्यात आले.

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “रवींद्र जडेजा अनेक वेळा त्याच्या तपासणीसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये गेला आहे. सध्या तरी तो बांगलादेश मालिकेसाठी तंदुरुस्त असण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत सौरभ कुमार याची संघात निवड होऊ शकते.”

या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी सौरभची कसोटी संघात निवड झाली होती. त्याने बंगळुरू येथे न्यूझीलंड अ (IND A vs NZ A) विरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियासाठी पाच विकेट घेतल्या आहेत.