नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धची एकदिवशीय मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ आता बांगलादेशी दोन हात करणार आहे, यासाठी खेळाडू नेटमध्ये घाम गाळताना दिसत आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे सिरीज ४ डिसेंबर पासून सुरु होणार आहे, यांच्यातील पहिला सामना शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर खेळवला जाईल.

दरम्यान, बांगलादेशविरुद्ध मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाला आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. शमीच्या हाताला दुखापत झाल्याचे समजत आहे. मात्र, बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट देण्यात आलेले नाहीत.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला ४ डिसेंबरपासून म्हणजेच रविवारपासून सुरुवात होत आहे. ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर उभय संघांमध्ये पहिला एकदिवसीय सामना होणार आहे. यानंतर दुसरा एकदिवसीय सामनाही ढाका येथे ७ डिसेंबर रोजी होणार आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे 10 डिसेंबर रोजी चितगाव येथे होणार आहे. त्यानंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल.