मुंबई, दि. 3 : मराठी भाषेचा प्रचार व प्रसार वैश्विक स्तरावर होण्यासाठी ‘मराठी तितुका मेळवावा’ या उदात्त हेतूने मराठी भाषा विभागामार्फत मुंबईत विश्व मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. वरळीच्या नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया (NSCI) येथे बुधवारी (दि.4) सकाळी 11.00 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय वाणिज्य, उद्योग, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आदींची उपस्थिती राहणार आहे.

दि. 4 जानेवारी 2023 या पहिल्या दिवशी सकाळी 9.30 ते 11 या वेळेत लेझीम पथक, ढोलताशा पथक, मर्दानी खेळ यांच्या प्रात्यक्षिकांद्वारे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत समारंभ होणार असून त्यानंतर 11.00 वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सिने-नाट्यसृष्टीतील कलाकारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम. ‘मराठी भाषा काल, आज, उद्या’ यावर परिसंवाद, दुपारी तीन ते चार वाजता मराठी वस्त्रालंकारांचा मराठमोळा फॅशन शो, सायंकाळी 5 ते 6 या वेळेत परदेशातील निमंत्रितांचे अनुभव कथन, सायंकाळी 6 ते 7 या वेळेत लोकसंगीताचा कार्यक्रम, रात्री 7 ते 10 या वेळेत चला हसूया अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

दि.5 जानेवारीला स. 10 ते 11.30 या वेळेत भावगीत, भक्तीगीत, नाट्यसंगीतांचा स्वर अमृताचा कार्यक्रम, स. 11.30 ते दु. 12.30 या वेळेत भारतातील आणि परदेशातील उद्योजकांचा परिसंवाद, दुपारी 12.30 ते 1.30 या वेळेत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती, दु. 2.30 ते 3.00 उपस्थितांची प्रश्नोत्तरे, साहित्य व संस्कृती मनोगत, दु. 3.00 ते 3.30 वाद्यमहोत्सव- ‘महाताल’, दु. 3.30 ते 3.45 स्वप्नील जोशी यांच्यासमवेत गप्पा, दु. 3.45 ते 4.45 हास्यजत्रा, सायं. 5 ते 6  परदेशातील निमंत्रितांचे अनुभव कथन, सायं. 6 ते 7 वाद्य जुगलबंदी, रात्री 7 ते 9 महासंस्कृती लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार दिनांक ६ जानेवारी रोजी सकाळी 9.30 ते 10.00 दरम्यान दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. स. 9.30 ते 10.30 वेळेत पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, स. 9.30 ते दु. 12.00 या वेळेत इन्व्हेस्टर मीट अंतर्गत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी हे मार्गदर्शन करणार आहेत. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्योजकांचा सत्कार करण्यात येणार आहे. दु. 12.00 ते 1.30 या कालावधीत आनंदयात्री या कार्यक्रमांतर्गत कविता वाचन, अभिवाचन आणि गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. दु. 3.00 ते 4.00 मुलाखत-गप्पाष्टक, दु. 4.30 ते 5.00 लावणीचा कार्यक्रम, सायं. 5.00 ते 6.00 परदेशातील निमंत्रितांचे अनुभव कथन, सायं. 6.00 ते 7.00 या वेळेत मंत्री तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप समारंभ होईल तर, रात्री 8 ते 10 या वेळेत मराठी बाणा या कार्यक्रमाने विश्व मराठी संमेलनाचा समारोप होईल.