मुंबई : ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. या डावखुऱ्या फलंदाजासाठी सध्याची आयपीएल आतापर्यंत चांगली राहिले आहे. 35 वर्षीय अनुभवी फलंदाजाने आयपीएलच्या 15 व्या हंगामात आतापर्यंत आठ सामने खेळले आहेत.
वॉर्नरने चार अर्धशतकांच्या मदतीने एकूण 356 धावा केल्या आहेत. वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या मॅचमध्ये वॉर्नरला त्याच्या मॅचविनिंग इनिंगसाठी मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं. या विजयानंतर वॉर्नर म्हणाला की, मुंबईतील या कडक उन्हात खेळणे आव्हानात्मक होते.
सनरायझर्स ही तीच फ्रँचायझी आहे ज्याने गेल्या वर्षी टूर्नामेंटच्या मध्यभागी डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून हटवले होते. इतकेच नाही तर अनेक सामन्यांमध्ये त्याला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेरही ठेवण्यात आले होते.
वॉर्नरने 58 चेंडूत नाबाद 92 धावांची खेळी करून त्याच जुन्या फ्रँचायझीचा पराभव केला. त्याने रोव्हमन पॉवेलसोबत चौथ्या विकेटसाठी नाबाद 122 धावांची भागीदारी केली. पॉवेलने 35 चेंडूत नाबाद 67 धावा केल्या.
सामनावीर ठरलेला वॉर्नर म्हणाला, “ही विकेट खरोखरच चांगली होती. या मैदानावर मला मोठे डाव खेळता आले. मला माहीत होते की मी माझे फटके खेळले तर मी येथे चांगली खेळी करू शकतो.
मुंबईत अशा उन्हात खेळणे आव्हानात्मक आहे. शेवटी मी थकलो होतो. मी आता म्हातारा होत आहे. दुसऱ्या टोकाला रोव्हमन पॉवेल असणे खूप छान होते. मला आनंद झाला की तो दुसऱ्या टोकाला उभा होता.”
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 3 गडी गमावून 207 धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने 8 बाद 186 धावा केल्या. हैदराबादकडून निकोलस पूरनने 34 चेंडूत 62 तर एडन मार्करामने 25 चेंडूत 42 धावा केल्या. दिल्लीकडून वेगवान गोलंदाज खलील अहमदने तीन आउट केले.